गंगापूर प्रतिनिधी
गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस रंगत चालला असून, प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत जोरदार रॅली काढली. दि. ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता सावता महाराज मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष आंबिलवादे आणि सोनाली योगेश पाटील यांनी नागरिकांना भेट देत संवाद साधला. “प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांचा विकास प्राधान्याने करण्यात येईल,” असे आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिले. रॅलीत ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषांच्या वातावरणात उमेदवारांनी मतदारांना आपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.















